आले गणपति आले
आख्यायिका
।। देवा तूचि गणेशु ।।
ओंकार गणेश हे निर्गुण निराकार परब्रह्माचे नादस्वरूप ! ओंकार हे सर्व विद्यांचे बीज मानले जाते. या बीजापासून सर्व वेदांचा विस्तार झाला. असा हा मंगलमूर्ती गणेश वेदांच्या आधीपासून पूज्य मानला जातो. निर्गुण परमात्म्याला ओळखण्याची ओंकार ही एक खूण आहे, असे वेदांनी कथन केले आहे. ओऽम् म्हणजे आदिदेवता आणि आदिदेवता म्हणजे गणेश ! अशा गणेशाला आत्मस्वरूप मानून सर्व कार्यारंभी त्याची प्रार्थना केली जाते. वेद या आदिदेवतेचे प्रतिपादन करतात. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद हे चारही ग्रंथ "अपौरुषेय' आहेत. त्यांची निर्मिती परमेश्वराच्या श्वासोच्छ्वासातून झाली आहे. असे मानतात. यापैकी ऋग्वेद हा प्राचीनतम वेद मानला जातो. यात ब्रह्मणस्पतिसूक्त दिलेले आहे. ब्रह्मणस्पती म्हणजेच गणपती. "ओऽम गणानां त्वा गणपतीं हवामहे।' समुदायाचा प्रमुख म्हणून आम्ही तुझी प्रार्थना करतो, अशा अर्थाच्या या ऋग्वेदातील मंत्राने त्याची पूजा केली जाते. या आदिदेवतेच्या जन्माविषयीच्या अनेक कथा प्रचलित आहेत.
गणेश जन्माविषयीची आख्यायिकागणेश पुराण, मुद्गल पुराण, ब्रह्म पुराण, ब्रह्मदेवर्त, अग्नि पुराण, पद्म पुराण, नारद पुराण, शिव पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, वामन पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्मांड पुराण, भविष्य पुराण आणि स्कंद पुराण या सर्व पुराणांमध्ये गणपतीच्या उत्पत्तीसंबंधी उल्लेख सापडतात. गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र मानला जात असला तरी तो "अयोनिज' आहे. एका कथेनुसार गणपती हा एकट्या शंकराचा पुत्र आहे. शिवाने आपल्या तपःसामर्थ्याने एक तेजस्वी सुंदर बालक निर्माण केले म्हणून पार्वतीला राग आला. तिने शाप देऊन त्या बालकाला बेडौल बनविले. दुसऱ्या कथेनुसार एकदा पार्वती स्नानगृहात स्नान करीत होती. स्नानगृहाच्या दारावर रक्षक नेमण्यासाठी तिने आपल्या अंगाच्या मळापासून एक लहान मुलगा बनविला. थोड्या वेळाने शंकर तेथे आला. त्यालाही त्या बालकाने आत जाण्यास मनाई केली. तेव्हा चिडून शंकराने त्या बालकाचे शिर धडापासून वेगळे केले. स्नान झाल्यावर पार्वती बाहेर आली. घडलेला प्रकार पाहून तिला वाईट वाटले. तिची समजूत घालण्यासाठी शंकराने त्या धडावर हत्तीचे शिर बसविले. तोच गणपती किंवा गजानन म्हणून ओळखला जाऊ लागला.
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रःगणपतीही शिवपरिवारातील मानला, तर या कथा त्याला अनुलक्षून आहेत. पण अशीही एक कल्पना सांगितली जाते, की शिव आणि गणेश या देवता एकच आहेत. म्हणजे जो "शिव' तोच "गणेश' आणि जो "गणेश' तोच "शिव'. अथर्वशीर्षात गणेशाला उद्देशून "त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रः' असे जे म्हटले आहे, ते केवळ तात्त्विक नसून दैवत शास्त्रानुसारही खरे आहे. त्याचप्रमाणे भालचंद्र, तृतीयनेत्र अणि नागभूषण ही तीनही शिवाची लक्षणे गणेश मूर्तीतही आढळतात. "तत्पुरुषाय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्तिः प्रचोदयात्।' या तैत्तीरीय आरण्यकात मंत्रात रुद्रगायत्री आणि गणेशगायत्री यांच्यातील साम्य स्पष्टपणे जाणवते. या मंत्रातील तत्पुरुष हे रुद्राचे नाव आहे. तर वक्रतुण्ड आणि दन्ती ही नावे गणेशाची म्हणून ओळखली जातात. म्हणजेच तैत्तिरीय आरण्यकाच्या काळात शिवाला वक्रतुण्ड आणि दन्ती ही नावे दिली असावीत. त्याचप्रमाणे तैत्तीरिय संहितेत उंदराला पशू म्हटले आहे. शिवाप्रमाणे गणेशाचीही लिंगरूपाने पूजा करतात. अग्नीप्रमाणेच "ग' हा गणेशाचा बीजमंत्र आहे आणि "अग्नीवैं रुद्रः' म्हणून अग्नी-रुद्रांना अभिन्न मानले आहे. पर्यायाने शिव आणि गणेशही अभिन्न होतात. त्यानंतरच्या काळात आर्यांनी आर्येतरांवर "व्रात' या नावाने आपल्यात सामावून घेतले. या संयोग काळात गणपतीचे जे स्वरूप झाले ते असे- गणपत्यथर्वशीर्षात "नमो व्रातपतये', असा उल्लेख केला आहे.
श्री गणेशाच्या नावांमागचा इतिहासया गणेशाची एकंदर बारा नावे आहेत. त्या प्रत्येक नावामागे काहीना काही इतिहास आहे. त्यापैकी विनायक या नावाचा इतिहास या ठिकाणी सांगण्यासारखा आहे. विनायक गण हे मानवाच्या कार्यात नेहमी विघ्ने आणत असत. सज्जनांच्या कार्यात नेहमी विघ्ने येतात आणि दुष्टांची कार्ये मात्र निर्विघ्नपणे कशी पार पडतात, असा प्रश्न देवांना पडला. यावर उपाय शोधण्यासाठी ते रुद्राकडे गेले. त्यांची चिंता ऐकून रुद्र उमेकडे टक लावून पाहू लागला. त्याबरोबर त्याच्या मुखातून एक तेजस्वी कुमार निर्माण झाला. तो जणू प्रतिरुद्रच होता. ते त्याचे प्रतिरुद्ररूप पाहून उमा चिडली. तिने त्या कुमाराला शाप दिला. त्यामुळे तो कुमार गजमुख, लंबोदर आणि सर्पवेष्टित झाला. ते पाहून शंकरही संतापला. त्याने आपल्या हातांनी आपले शरीर घासले त्यातून अनेक शस्त्रांनी युक्त विनायक गण उत्पन्न झाले. ते नीलवर्ण, गजमुख अणि वक्रतुण्ड होते. ब्रह्मदेव म्हणाला ""शंकराने हे गण देवांच्या कल्याणासाठीच उत्पन्न केलेले आहेत.'' मग तो शंकराला म्हणाला, "" हे गण तुझ्या या कुमाराच्या अधिकारात राहू देत. या सर्वांना तू वर दे.'' यावर शंकर आपल्या पुत्राला म्हणाला, ""तुला गजमुख, गणेश आणि विनायक अशी नावे प्राप्त होतील. क्रूर असे हे विनायक गण तुझे सेवक होतील. यापुढे यज्ञादी कार्यात तुझी पूजा प्रथम होईल. जो कोणी ती करणार नाही त्याच्या कार्य सिद्धीत तू खुशाल विघ्ने आण.''
तेव्हापासून आपण प्रत्येक कार्यारंभी गणपतीची पूजा करतो. कार्य निर्विघ्न पार पडण्यासाठी त्या विघ्नहर्त्याची प्रार्थना करतो. प्रत्यक्ष शंकरही एका युद्धारंभी गणेशपूजन करायला विसरला. त्यामुळे त्या युद्धात त्याला हार मानावी लागली होती, असा पुराणात उल्लेख आढळतो. "विघ्नकर्त्या' विनायकाचे "विघ्नहर्त्या' गणेशात रूपांतर झाले. हा कालावधी साधारणपणे गुप्तकाल असावा. हे जरी खरे असले तरी खऱ्या गणपती-भक्तांना त्याच्या ऐतिहासिक स्वरूपाचे अजिबात स्वारस्य वाटत नाही. ते त्याचे आध्यात्मिक स्वरूपच तेवढे खरे मानतात.
गणपती अथर्वशीर्षगणपती अथर्वशीर्षात या आध्यात्मिक स्वरूपाचे सार सांगितले आहे. गणेशालाच तत्त्व, ब्रह्म आणि आत्मा असे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर असेही म्हटले आहे, की गणेशच ज्ञानमय आणि विज्ञानमय आहे. म्हणजेच गणेशच सर्वकाही आहे. वाङमयाचे मूळ आणि नादाचेही मूळ, असा हा गणेश आहे. या गणेशाची उपासना साक्षात ब्रह्मविद्या मानलेली आहे. संत एकनाथ त्याला मायेचा अधिष्ठाता परमेश्वर असे म्हणतात. लंबोदर या नावाचा अर्थ सांगताना ते म्हणतात - "तुजमाजी वास चराचरा म्हणोनी बोलिजे'. लंबोदरागणेश मूलाधार चक्राचा स्वामी आहे. त्या चक्राचा आणि तिथल्या कमळाचा रंग लाल असल्यामुळे गजाननाला रक्तपुष्प, रक्तचंदन आणि लाल रंगाचे वस्त्र आवडत असावे. दुर्वा, शमी, मंदार हेही गणपतीला प्रिय आहेत. तसेच चतुर्थी म्हणजे जागृती गणेशाची प्रिय तिथी आहे.
विघ्नराजतंत्रशास्त्रातही या विघ्नराज गणेशाला अतिशय महत्त्व आहे. बौद्धांच्या तंत्रशास्त्रातही गणपतीला पूज्यनीय देवता मानतात. गौतम बुद्धाने आपल्या आनंद नावाच्या शिष्याला "रहस्यमय गणपतीहृदय' नावाचा मंत्र सांगितला होता. अशी ही आद्यदेवता फक्त भारतातच नाही, तर परदेशातही पूज्य मानली जाते. चिनी विद्वान पूर्वी भारतात शिक्षणासाठी आले होते. त्यांनी परत जाताना आपल्याबरोबर बौद्धधर्म, भारतीय संस्कृती आणि श्री गणेश यांना आदराने चीनमध्ये नेले. चीन आणि जपानमध्ये गणेशाला कांगी-तेन असे म्हणतात. ब्रह्मदेश, सयाम, कंबोडिया, जावा, बाली, बोर्निओ, तुर्कस्थान, मेक्सिको इत्यादी देशांतही गणपती आढळतात. लॅटिन संस्कृतीतील "जानुस' ही देवता आपल्या गणपतीसारखीच आहे. आपण गणेशाची मूर्ती घराच्या किंवा देवळाच्या द्वारावर कोरतो. त्याचप्रमाणे लॅटिन संस्कृतीतील लोकही "जानुसा'ची मूर्ती घरादारांवर कोरतात. त्यावरून इतिहासाच्या ओघात अनेक जमातींच्या देवतांचे एकत्रिकरण होत होत, अथर्वशीर्षातील गणपती सिद्ध झाला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.अशा या महान देवतेने मानवाला संकटातून सोडविण्यासाठी महोत्कट विनायक, गुणेश, गणेश आणि धुम्रकेतू असे चार अवतार घेतल्याचा उल्लेख पुराणात सापडतो.या वैदिक देवतेची आपल्या संतांनीही महती गायिली आहे. ज्ञानदेवांनी त्याला आदिदेव म्हटलेलेच आहे. परंतु त्याचबरोबर त्यांनी षड्भुज गणेशाचेही स्तवन केलेले आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशची मूर्तिरूपात प्रतिष्ठापना करतात. ती मूर्ती मातीचीच असते. दीड दिवस, पाच दिवस किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीचा उत्सव साजरा करतात. चतुर्थी ही सर्वात पहिली तिथी. तिच्यापासून मग प्रतिपदा ते पौर्णिमा व अमावास्या या तिथी निर्माण झाल्या, म्हणून चतुर्थी ही सर्व तिथींची माता आहे. याच तिथीपासून गणेशोत्सवाला सुरुव
ात होते. हाच उत्सव लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करायचे ठरवले. या सार्वजनिक उत्सवामुळे लोकजीवनात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. एवढेच नव्हे, तर लोकमान्यांना अपेक्षित असलेली लोकजागृतीही झाली. अनादी कालापासून महान ठरलेली ही वैदिक, आध्यात्मिक देवता अशा रीतीने हळूहळू लोकदेवता बनली.
गणेश जन्मकथा
एके दिवस पार्वती स्नानगृहामध्ये स्नान करीत असता तेथे शंकर आले. तेव्हा पार्वती लाजली. त्यावर पार्वतीच्या सख्यांनी सांगितले, की दारावर रक्षक ठेवल्यास, कोणी आत येणार नाही. त्यावर पार्वतीने आपल्या अंगच्या मळाने एक बालक उत्पन्न करून, त्याला प्रवेशद्वारावर बसण्याची आणि आत कोणालाही न सोडण्याची आज्ञा दिली. पुुढे प्रत्येक दिवशी शंकर येत; परंतु त्यांना परवानगी घेतल्याशिवाय आत प्रवेश मिळत नसे. याचा शंकराची शोचनीय स्थिती झाल्यामुळे त्याला राग आला. रागाच्या आवेशात शंकराने त्या बालकाचा वध केला. आपण उत्पन्न केलेल्या बालका वध झाल्याचे ऐकताच, पार्वती कृद्ध झाली. संतापाच्या भरात ती त्रैलोक्य जाळून टाकते की काय अशी सर्वांना भीती वाटू लागली. तेव्हा नारदांनी मध्यस्थी करून त्या बालकाला पुन्हा जिवंत करण्याचे ठरविले. येथून जाताच प्रथम जो दृष्टीस पडेल त्याचे शिर तोडून आणा, अशी शंकराने त्याच्या गणांना आज्ञा दिली. त्याच वेळी लोकांना त्रास देण्यास निघालेला गजासूर नावाचा राक्षस त्यांच्या दृष्टीस पडला. गणांनी त्याचे डोके आणून पार्वतीने उत्पन्न केलेल्या बालकाच्या धडाला लावल्यावर तो जिवंत झाला. तो दिवस भाद्रपद चतुर्थीचा होता.याबाबत दुसरी कथा अशी सांगितली जाते, की आपल्या पित्यास देवीने मारल्यामुळे महिषासुराचा मुलगा गजासूर हा देवांचा आणि देवीचा मत्सर करी. देवांचा नाश करण्याकरिता त्याने शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाला व म्हणाला, "तुला ब्रह्मांडाचे राज्य मिळेल आणि कोणाच्याही हातून तुला मरण येणार नाही. हा वर मिळाल्यामुळे गजासुर उन्मत्त झाला. शेवटी प्रत्यक्ष शंकरावर स्वारी करून त्यास पळवून लावले. प्रत्यक्ष शंकराची अशी स्थिती पाहताच सर्व देव अरण्यात निघून गेले व तेथे गणेशाची स्तुती करू लागले. स्तुतीच्या योगाने श्रीगणपती प्रसन्न झाले व म्हणाले
तुम्ही भिऊ नका. मी अवतार घेऊन गजासुराचा वध करतो. पुढे काही काळाने देवांना सांगितल्याप्रमाणे गणेशाने अवतार घेतला आणि गजासुराचा वध करून सर्व देवांना सुखी केले. तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा होता. सर्वांचे संकट नाहीसे झाल्यामुळे लोकांनी गणेशाची पूजा केली. तेव्हापासून दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली.
गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थीच्या दिवशी "गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष करत घराघरामधून गणपतीच्या मूर्तींची स्थापना केली जाते. या पूजेत 21 या संख्येला महत्त्व असते. उदाहरणार्थ 21 दुर्वा, 21 फुले, 21 मोदक वगैरे. अथवर्शीर्षाचे पठण आणि गणपतीची आरती केली जाते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असे दहा दिवस हा गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. तथापि, आपापल्या चालीरीतींनुसार लोक दीड, दोन, पाच, सात किंवा कोणाकोणाकडे दहा दिवस हा उत्सव करतात. नंतर या मूर्तीचे विहीर, तलाव, नदी अथवा समुद्रामध्ये विसर्जन करण्यात येते
गणेश पूजन
भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणपती मूर्ती घरी आणून तिची पूजा करतात म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी म्हणतात. प्रत्येक पक्षांतील चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षांतील चतुर्थीस विनायकी व कृष्ण पक्षांतील चतुर्थीस संकष्टी म्हणतात; पण संकष्टी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी म्हणतात. भाद्रपद व माघ महिन्यांतील चतुर्थी विशेष मानतात.
मुद्गल पुराणात कथा आहे ती अशी...एके दिवशी ब्रह्मदेव स्वस्थ बसले असता त्यांना जांभई आली. जांभईतून एक तेजस्वी पुरुष उत्पन्न झाला. त्याचे नाव "सिंदूर' असे ठेवण्यात आले. त्या सिंदूराला वर दिला, की तू ज्याला आलिंगन देशील तो मरेल. हा वर ऐकून तो सिंदूर ब्रह्मदेवासच आलिंगन देण्यास निघाला. सिंदूर आपणास मारण्यास येत असल्याचे पाहून ब्रह्मदेव रागावला. "तुला एकदंताच्या हातून मृत्यू येईल' असा शाप देऊन तो वैकुंठास पळून गेला. त्याच्या मागोमाग सिंदूरही वैकुंठास गेला. श्री विष्णूने सिंदुरास नम्रपणे "आम्ही तुला शरण आलो आहोत. तू शंकराकडे जा. तो सर्वांचा नाश करणारा आहे,' असे सांगितले. हे ऐकून सिंदूर कैलासाला गेला. तेथे शंकर ध्यानस्थ बसले होते. इतक्यात त्याचे लक्ष पार्वतीकडे गेले. त्या त्रैलोक्यसुंदरीला पाहून सिंदुरासूर तिला उचलून नेऊ लागला. त्या वेळी पार्वतीने गणपतीची स्तुती केली. गणपतीने प्रसन्न होऊन, "तुमच्या पोटी जन्म घेऊन सिंदूराचा वध करीन' असे अभयवचन दिले. वचनाप्रमाणे गणपतीने पार्वतीच्या उदरी प्रवेश केला. काही महिने गेल्यावर सिंदुरासुराने पार्वतीच्या उदरातील गर्भाच्या मस्तकाचा छेद करून ते मस्तक नर्मदा नदीत टाकून दिले. यावरूनच नर्मदा नदीचे पाणी व त्यातील दगड लाल झाले. त्या दगडांना "नर्मदागणपती' असे म्हणतात. पूर्ण दिवस भरल्यावर पार्वती प्रसूत झाली. परंतु त्या मुलाला मस्तक नव्हते. इकडे इंद्राचा ऐरावत मत्त झाला होता. त्याचे डोके श्रीविष्णूने कापून आणून मुलाला लावले. गजमुखामुळे त्याचे नाव "गजानन' ठेवण्यात आले. गजाननाने सिंदुरासुरास ठार मारून सर्वांवरील संकट नाहिसे केले, ते भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी. म्हणून त्या दिवशी पूजा करण्याची चाल पडली.
धार्मिक विधि व रूढीभाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पहाटे उठून सुगंधी तेल लावून स्नान करावे. आपापली नित्यकर्मे उरकावी. नंतर घरातील वडीलधाऱ्यांनी श्रीगणपतीची सोने, रुपे किंवा मातीची मूर्ती आणून पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवावी. त्या ठिकाणी उत्तम प्रकारची आरास करावी, फुलझाडांच्या कुंड्या ठेवाव्या, रांगोळी घालावी, निरनिराळी फळे मांडून ठेवावी.पूजेसाठी रक्तचंदन, दूर्वा, सुवासिक फुले, तुळस (तुळस फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी वाहतात), केतकी, शमी, शेंदूर, निरनिराळी एकवीस प्रकारची पत्री, बुक्का व पंचामृत हे पदार्थ तयार करून ठेवावेत.
अशी तयारी झाल्यावर स्वत: अगर उपाध्यायाकडून पूजा म्हणवून महाभिषेक करवून भक्तिपूर्वक सोळा उपचारांनी (सोळा उपचार : आवाहन, आसन, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व मंत्रपुष्प) पूजा करावी. नंतर आरत्या म्हणाव्यात. आरत्या म्हटल्यावर घरांतील लहान थोर मंडळींनी शमी वगैरे पदार्थ वाहावे व नमस्कार करावा. इतके झाल्यावर ब्राह्मणास मोदकाचे भोजन द्यावे. (गणपतीस मोदक फार प्रिय आहेत). भोजन झाल्यावर स्त्रियांनी गाणी म्हणावी, फुगड्या वगैरे खेळ खेळावे व लहान मुलांनी मनाला आनंद देणारे खेळ खेळावे. अशा रीतीने सर्व मंडळींनी तो दिवस मोठ्या आनंदात घालवावा. सायंकाळी इष्टमित्र बोलावून धूपारती करावी. शक्तीप्रमाणे दीड, पाच, सात अगर दहा दिवस गणपती ठेवावा. रोज त्रिकाल अगर दोन वेळा पूजा करून मोठ्या उत्साहाने उत्सव साजरा करावा. शेवटी त्या मूर्तीची उत्तरपूजा करून सर्वांच्या कल्याणाची मागणी करावी. नंतर पालखीत किंवा डोक्यावर मूर्ती घेऊन वाजत गाजत समुद्रात किंवा दुसऱ्या ठिकाणी नेऊन विसर्जन करावे.